चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देऊन शकले नाहीत; पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मराठ्यांना आरक्षण दिले. आता भविष्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण महायुती शासनच देऊ शकते, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
इचलकरंजी येथील नामदेव मैदानात आयोजित युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मोहोळ म्हणाले, ‘कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीसह विविध कामांसाठी ३८० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे मँचेस्टर उद्योगाला गती मिळणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून, त्यामध्ये राहुल आवाडे यांचा निश्चितपणे सहभाग असणार आहे, तर हाळवणकर यांनाही विधान परिषदेवर संधी मिळणार आहे. खासदार धैर्यशील माने म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेने निकाल पक्का केला असून, आवाडेंचा विजय निश्चित आहे.