महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर पहिला हक्क माझा; भगीरथ भालकेंनी केला दावा

पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. विशेषतः तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.यामध्ये लोकसभा निवडणुकीला भाजप महायुतीसोबत असणाऱ्यांचाही समावेश आहे.

तोच मुद्दा पकडत भगीरथ भालके यांनी सध्याचे इच्छूक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर नव्हते. आम्ही महाविकास आघाडीचे काम केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर पहिला हक्क माझा आहे, असा दावा भालके यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. भालके यांची ही यात्रा सध्या मंगळवेढा तालुक्यात आहे.

मंगळेवढा तालुक्यातील भाळवणी येथे यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत भालके यांनी उमेदवारीबाबतचा दावा केला आहे.भालके म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केले आहे.

सध्याचे इच्छुक महाविकास आघाडीसोबत नव्हते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभा उमेदवारीवर पहिला हक्क माझा आहे. पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातील प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीची साथ हवी आहे, अशी भूमिका मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसमोर मांडली आहे.