दिवाळीनिमित्त पुणे-कोल्हापूर मार्गावर सर्वाधिक प्रवास

दिवाळी सणाला गावी जाण्यासाठी एसटी बसला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. गेल्या चार दिवसांत दिवसाला जवळपास दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला. यात महिलांना पन्नास टक्के सवलत असल्याने महिलाही सर्वाधिक संख्येने प्रवासाला निघाल्या आहेत. परिणामी एकूण प्रवासी संख्येत वाढ झाल्याने एसटीला चार दिवसात दोन कोटींचा वाढीव महसूल मिळाला. यात एसटीने जादा गाड्या सोडल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली.

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असलेले लोक कोल्हापुरात येतात व कोल्हापूरातून काही आपल्या परजिल्ह्यातील गावी जातात. त्यामुळे दिवाळीसणापूर्वी चार दिवस व दिवाळी सणानंतर चार दिवस प्रवासी संख्येत वाढ होते. त्यानुसार यंदाही एसटीला प्रवासी संख्या वाढली. कोल्हापुरातून रोज पुण्यासाठी १८ फेऱ्या होतात मात्र यात दुप्पटीने वाढ झाली.

पुण्यावरून कोल्हापूर येणारे व पुण्याला जाणारे अशा दोन्ही बाजूचा प्रवासाचा समावेश होता. त्यामुळे सर्वाधिक प्रवास हा पुणे मार्गावर झाला. एसटीला रोज किमान १७ ते १८ लाखांचा वाढीव महसुल या मार्गावर मिळाला.

याशिवाय सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याभागात जाणाऱ्या प्रवाशांचाही प्रातिसाद होता. साधी बस, निमआराम, शिवशाही, शिवाई अशा सर्वच बसला प्रवासी भारमान वाढले. थोड्या फारफरकाने इचलकरंजी, चंदगड, आजरा, कागल, गडहिंग्लज येथील आगारातून प्रवासी संख्या जास्त होती. तसेच फेऱ्या मध्येही वाढ झाली.

जिल्ह्यात एसटीच्या ७०० गाड्या आहेत यातील २५० गाड्या दिर्घपल्ल्याच्या सेवेसाठी वापरल्या गेल्या आहेत. तर स्थानिक प्रवासासाठी त्या-त्या आगारांनी गाड्या वापरल्या, वेळेचे काटेकोर नियोजन केल्याने प्रवासी प्रतिसाद असलेल्या मार्गावर दहा मिनिट ते अर्ध्या तासाला गाडी उपलब्ध झाली. त्यामुळे प्रवाशांची सोय होऊ शकली.

खासगी बसच्या प्रवासी संख्येतही वाढ

खासगी आराम बसलाही प्रवासी संख्येत वाढ झाली आहे, गर्दी वाढलेल्या काळात भाडेही वाढले आहे. पुण्यासाठी ७००, तर मुंबईसाठी १२०० ते १५०० हजार रुपये भाडे आकारण्यात येत होते. ज्या गाड्यांना प्रवासांची संख्या कमी होती. तेथे नियमित भाडे आकारून प्रवासी वाहतूक होत आहे.

आरक्षण सुविधेचा वापर कमी

एसटी महामंडळ व खासगी आराम बसकडे ऑनलाईन आरक्षण सुविधा आहेत. यात खासगी आराम गाड्याकडे ऑनलाईन बुकिंगचे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे, तर एसटीकडे आरक्षण करण्याचे प्रमाण पुणे, मुंबई वगळता अन्य जिल्ह्यातील प्रवासासाठी अवघे ३० टक्के आहे. त्यामुळे एसटीतून गर्दी असली तरी उभे राहून अनेक प्रवास करीत आहेत. अशी गैरसोय टाळण्यासाठी पूर्व आरक्षणाचा वापर करणे सोयीचे ठरू शकते.