Ichalkaranji Bus: एसटीचे नियोजन कोलमडले

इचलकरंजी शहरात सांगली, मिरज, जयसिंगपूर, कोल्हापूर, कुरुंदवाड आगारांतून एसटी बसेस शहरात येतात. या आगारातील एसटी गाड्यांबाबत प्रवाशांच्या अडचणी आहेत. या तक्रारी इचलकरंजी आगारात केल्या जातात.प्रत्येक मार्गावर एसटीला प्रवाशांची गर्दी कायम आहे. त्यानुसार गाड्यांचे वेळापत्रक ठरवणे क्रमप्राप्त आहे. मात्र इचलकरंजी शहरात ये-जा करणाऱ्या गाड्यांचे नियोजन कोलमडल्याचे दिसत आहे. सकाळच्या सत्रात गर्दी नसताना एसटी गाड्या एकामागून एक धावत आहेत. इचलकरंजीकडून सांगली, मिरज मार्गावर, तर मिरज, सांगलीवरून गाड्यांची ही स्थिती आहे.

तसेच ग्रामीण भागातही परिस्थिती फार वेगळी नाही. याचा फटका विद्यार्थी, नोकरदार प्रवाशांना बसत आहे.सकाळी साडेनऊनंतर मार्गावर गाड्यांचे नियोजन कोलमडत आहे. वेळेत गाड्या येत नसून, आल्या तर निश्चित थांब्यावर थांबत नाहीत. यावेळेत विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने एसटी तुडुंब भरलेली असते. अशावेळी एसटीची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे. पासधारक विद्यार्थ्यांची अधिक कुचंबणा होत आहे.अशावेळी इचलकरंजी आगाराने इतर आगारांशी समन्वय ठेवून अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.