गणपती विसर्जनानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली या गतिमान झालेल्या पाहायला मिळत आहेत. इचलकरंजी विधानसभा महायुती मध्ये भाजपकडे असल्याने शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. राज्यात किंवा जिल्ह्यात काही जागांची अदलाबदल करून इचलकरंजी मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी तयारी केली आहे तर राष्ट्रवादीकडूनही जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांना देवगिरी बंगल्यावरून भेटीचे निमंत्रण आले होते. गणपती विसर्जनानंतर त्यांनी गुरुवारी रात्री तातडीने राजधानी गाठली शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेऊन मतदारसंघातील सद्य राजकीय परिस्थितीचा अहवाल त्यांच्यासमोर ठेवला.
ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आपल्याला निश्चित यश मिळेल असा दावाही त्यांनी केला. यानंतर अजित दादांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करण्याची सूचना केली. यावेळी विठ्ठलराव इचलकरंजीतून तुम्ही लढण्याच्या तयारीत रहा असा कानमंत्र दिल्याची माहिती समोर आलेली आहे.