इचलकरंजी मतदारसंघात आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने एकास एक लढतीची शक्यता

आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ताराराणी पक्षात उत्साह, तर भाजपमध्ये अस्वस्थता असे वातावरण असून दोन्हीकडील कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान नेत्यांसमोर आहे.दरम्यान, आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने इचलकरंजी मतदारसंघात एकास एक लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने शहरातील महायुतीसह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आवाडे यांच्या नेहमी विरोधात असणारे अनेकजण महायुतीमध्ये कार्यरत होते. आवाडे यांनी राजकीय खेळी करत तेथे उडी घेतल्याने त्यांची गोची झाली असून, त्यांची पुढील भूमिका कशी राहणार, याकडेही लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्येही खलबत्ते सुरू असून, आवाडे यांना टक्कर देण्यासाठी एकत्रित येऊन एकास एक उमेदवारीची समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात महायुतीमधील परंपरागत कट्टर आवाडे विरोधक सोबत येऊन अथवा अंतर्गत आपणास मदत करतील का, यासाठीही चाचपणी सुरू आहे.