टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. खानापूर, आटपाडी आणि विसापूर मंडलातील उर्वरित वंचित 54 गावांना टेंभूचे पाणी मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. दुष्काळी खानापूर, आटपाडी मतदारसंघांमध्ये टेंभू योजनेच्या माध्यमातून जलक्रांती झालेली आहे. त्यामुळे आटपाडी दुष्काळी भागाचे नंदनवन करणारे उपसा जलसिंचन योजना पूर्णत्वास येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न हे सत्यात उतरत आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वच गावांना टेंभूचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा केला आणि टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात मंजुरी देखील मिळवली. यामुळे आता खानापूर आटपाडी मतदारसंघातील सर्वच गावे टेंभूच्या लाभक्षेत्रात येणार आहेत असे सुहास भैया बाबर यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यातील पळशी गावातील तलावातून पळशी उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. पळशी तलाव टप्पा क्रमांक पाचच्या गोरेवाडी कालव्यातून स्वतंत्र फीडरने भरला जाणार आहे. कामथ वितरीकेतून आटपाडी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे.
मानखटाव वितरीकेतून आटपाडी पश्चिम भागातील गावांना पाणी मिळणार आहे. या माध्यमातून खानापूर तालुक्यातील 28,आटपाडी तालुक्यातील 14 व तासगाव तालुक्यातील बारा या वंचित गावांना पाणी मिळणार आहे. या माध्यमातून सुमारे 18000 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येत आहे.