आटपाडी येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ भव्य सभा करण्यात आली होती. यावेळी सुहास बाबर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, त्यांना मंत्रिपद देऊन मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. खासदार धैर्यशील माने यांनी देखील बाबर यांच्या मंत्रिपदाला दुजोरा दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनिल बाबर यांची उणीव जाणवते आहे. लोकांसाठी काम करणारा हा नेता लोकांसाठी राबला. उठावावेळी ते खांद्याला खांदा लावून उभे राहिले. टेंभूच्या पाण्यासाठी त्यांनी राजकारणविरहित काम केले. सुहास बाबर यांना विजयी करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबर आणि परिवार ही माझी जबाबदारी आहे. तानाजी पाटील हा त्यांचा पाठीराखा जिवाला जीव देणारा किंगमेकर आहे. अशी माणसं दुर्मीळ असतात. त्यांनाही राज्यस्तरावर मोठी जबाबदारी देऊ. या परिसरात एमआयडीसी आणि कारखाना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सुहास बाबर म्हणाले, जनतेच्या भल्यासाठी अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतदारसंघाचा विकास झाला. टेंभू योजनेचा सहावा टप्पा मंजूर झाल्याने जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी पाणी आणले आणि दुष्काळ हटला. अनिल बाबर यांच्यावर विरोधकांनी टीका केली, पण टेंभूचे दिवास्वप्न आता पूर्ण होत आहे. एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही.