शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यात कोणत्या पिकाची करावी लागवड जेणेकरून मिळेल फायदाच फायदा!

अलीकडच्या काळामध्ये नोकरीअभावी तरुण वर्ग हा शेतीकडे वळत चाललेला आहे. परंतु कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी याची माहिती नसल्याकारणामुळे जास्त नफा मिळत नाही. तर आज आम्ही तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून त्यात आपणाला फायदा मिळेल हे जाणून घेऊया…

दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात. महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.

१७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.

जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खत वापरून आलेले आले गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात. सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.

द्राक्षाची एप्रिल, ऑक्टोबर छाटणी लवकर घेऊन रमजान व नाताळाला द्राक्ष आखाती राष्ट्र व युरोप राष्ट्रात निर्यात करता येतात. तसेच महिनाभर अगोदर द्राक्ष काढल्यामुळे पाणी, मजुरी, खत, औषधे यांच्यात बचत होते. रमजान, नाताळ व इतर सणांसाठी कलिंगड व खरबुजाची लागवड सलग किंवा आंतरपीक (डाळींबात किंवा शेवग्यात) घेतले तर रमजान किंवा नाताळाला देशांतर्गत मार्केटमध्ये निर्यातीस उपलब्ध होतात. हा अनुभव बर्‍याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.

गणपती झाल्यानंतर पितृ पंधरावड्यामध्ये विविध प्रकारची भाजी यावी. यासाठी नियोजन करून उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना अल्पावधीत कमी लागवडीत पैसे मिळवता येतात.सप्टेंबर, ऑक्टोबर (भाद्रपद) महिन्यात थंडी सुरू होण्यापूर्वी भेंडी वितभर आपल्या तंत्रज्ञानाने उगवून ऐन थंडीत भेंडीचे हमखास पैसे होतात.नवरात्रीच्या अगोदर बाजरी, हळवा कांदा अथवा उडीद काढल्यावर गहू करताना गव्हाची लागवड जर्मिनेटर लावून १९ नोव्हेंबरच्या आत करावी व गव्हास लागवडीपासून दर २१ दिवसांनी (२१,४२,६३,८४,१०५,१२६) जसे पाणी उपलब्ध असेल तशा पाळ्या द्याव्यात, परंतु पाळ्या कधीही चुकवू नयेत.४२ व्या दिवशीचे पाणी उपलब्ध नसल्यास ६३ व्या दिवशी द्यावे. ६३ व्या दिवशी नसेल तेव्हा ८४ व्या दिवशी द्यावे आणि १०५ व्या दिवशी हमखास पाणी द्यावे, म्हणजे गव्हात चिक भरतेवेळी हमखास पाणी द्यावे.

पाण्याची कमतरता असल्यास डाळींबाचा मृग बहार धरावा आणि ह्या बहाराची फळे द्राक्ष व आंबा मार्केटला येण्यापूर्वी (१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी) आणावीत.द्राक्ष शक्यतो लवकर सुरू करून नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये मार्केटला आणून १ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत संपवून टाकावीत. कुठल्याही परीस्थितीत द्राक्ष, डाळींब हे आंब्याच्या काळात येणार नाही. हे पाहावे.

स्ट्रॉबेरी देशभर या विज्ञानाने कोठेही येऊ शकते, ती नाताळाला मार्केटमध्ये येईल, हे पहावे तसेच ती फेब्रुवारीपर्यंत चालावी व एप्रिलमध्ये कमी होऊन मे मध्ये जास्त यावी, हे पहावे. म्हणजे मे चे भाव सापडतात. सिताफळ गौरी गणपतीत यावीत यासाठी मार्गशिर्षात सिताफळास खांदणी करून सेंद्रिय खत द्यावे व पाणी सोडावे. म्हणजे उन्हाळ्यात फुलगळ होत नाही. पावसाळ्यात सिताफळे काळी पडत नाहीत, डोळे मोठे होतात व दसरा – दिवाळीच्या मंदीत फळे सापडत नाहीत.

अंजीराचा बहार खट्टा असो वा मिठ्ठा, तो खट्ट्याबहाराच्या फळांनासुध्दा गोडी येऊन बहार चांगला येऊन हमखास पैसे होतात. मिठ्ठा बहाराची फळे फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळून चांगला दर मिळतो. शिवाय पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे बाग न तुटता पाणी, खत व मेहनतीमध्ये बचत होते. हळवी कांदा किंवा रांगडा कांदा मार्केटल भाव सापडतात.

१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरला फुरसुंगी हा गेल्यावर्षीचा साठवणीतला कांदा मार्केटला आणला तर दक्षिण भरतातील आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यातील मोठ्या शहरात म्हणजेचे बेंगलोर, चेन्नई, तिरूअनंतपुरम, कोईमत्तूर अशा शहरात कांद्याचे भाव चढे (वाढते) राहून हमखास पैसे होतात. आंबा (हापूस) एप्रिलच्या अगोदर मार्केटला आणला तर पैसे तर होतातच, परंतु मे महिन्यात अति उष्णतेने जो साका होतो तो हमखास टाळता येतो. श्रावण व वैशाखमध्ये कमी पाण्यावर मूग करावा. म्हणजे भाद्रपद महिन्यात व उन्हाळ्यामध्ये हे पैसे वापरता येतात.