विटा – खानापूर रस्त्यावरील बळवंत महाविद्यालयाच्या गेट जवळ एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. लखन संभाजी चव्हाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विटा – खानापूर रस्त्यावरील बळवंत महाविद्यालयासमोर एक चोरटा चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार बळवंत महाविद्यालयाच्या गेट जवळ पोलिसांनी सापळा लावला. काही वेळानंतर एकजण दुचाकीवरून गेट जवळील पार्किंग समोर येऊन संशयस्पदरित्या उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव लखन संभाजी चव्हाण असल्याचे सांगितले. त्याच्याकडील पिशवीत सोने आणि चांदीचे दागिने आढळून आले. सदरचे दागिने खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील घरफोडी करून तसेच आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावात सोप्यात झोपलेल्या महिलेच्या उशास ठेवलेले दागिने चोरी केल्याची कबुली या चोरट्याने दिली आहे. या चोरट्याकडून सुमारे दोन लाखांचे दागिने जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
