Govinda Gun fire: चुकून नव्हे तर गोविंदाने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर स्वत:च दाबला….

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते गोविंदा हे मंगळवारी गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना गोळी कशी लागली, याबाबत वेगवेगळी माहिती समोर आली होती. एका थिअरीनुसार गोविंद हे पहाटे पाच वाजता रिव्हॉल्व्हर साफ करत होते, तेव्हा चुकून ट्रिगर दाबला जाऊन त्यांना गोळी लागली, असे सांगितले जाते. तर दुसऱ्या थिअरीनुसार गोविंदा हे बाहेर जाण्यासाठी निघाले होते तेव्हा रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडून त्यांना गोळी लागली, अशी माहितीही समोर आली होती. त्यानंतर आता पोलीस चौकशीतही गोविंदाने दिलेली माहिती संशयास्पद असल्याचे आढळले आहे.

गोविंदा यांच्यावर जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळी लागल्यानंतर त्यांच्या पायातून मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन गोविंदा यांच्या गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढली होती. त्यानंतर गोविंदाची प्रकृती स्थिर होती. यादरम्यान पोलिसांनी गोविंदाचा जबाब नोंदवला होता. या जबाबात अनेक विसंगती आढळून आल्याची माहिती आहे.

मुंबईगुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रभारी दया नायक यांनी मंगळवारी क्रिटी केअर रुग्णालयात जाऊन गोविंदा यांची भेट घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस गोविंदा यांनी दिलेल्या जबाबावर संतुष्ट नाहीत. चौकशीवेळी गोविंदा यांना अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. गोविंदाचा एकुण जबाब पाहता रिव्हॉल्व्हरमधून गोळी अचानक सुटली नसून गोविंदा यांनी स्वत:च ट्रिगर दाबल्याचा संशय पोलिसांना आहे. याशिवाय, पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे गोविंदा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे. गोविंदा यांच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलीस आता रिव्हॉल्व्हरच्या बॅलेस्टिक अहवालाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.