राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. अशात आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी म्हणता येईल अशी बातमी समोर येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामतीमधून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
राज्यातील उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे असलेला पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. यासह हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती पाहता येथून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.