१६ डिसेंबरला अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा! उद्धव ठाकरेंची घोषणा

राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच राज्य सरकारने अदाणी समूहाला आधीच अनेक सवलती दिल्या आहेत.

तसेच आता तिथल्या पुनर्विकासातून निर्माण होणारा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) खरेदीची सक्ती अन्य विकासकांवर केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला धारावीतील टीडीआर दोन ते तीन पट महाग असल्याने आणि तो तातडीने उपलब्ध होणार नसल्याने सध्या झोपडपट्टी पुनर्वसनातील ‘टीडीआर’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

परिणामी, झोपडपट्टी पुनर्वसनातील टीडीआरचा दर वधारला असून घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचं वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतंच प्रसिद्ध केलं होतं. या वृत्ताचा दाखला देत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला नियोजनशून्य विकासकामांमुळे मुंबईकरांचा जीव घुसमटतोय. शहरातलं प्रदूषण प्रचंड वाढलं आहे.

हे सरकार केवळ कंत्राटदारांसाठी काम करतंय. आधी प्रदूषण वाढवणं आणि मग ते रोखण्यासाठी नवी यंत्र आणली जातायत, मग त्यासाठी परत कंत्राटं दिली जात आहेत. हे कंत्राटदारांचं सरकार आहे. मुंबईतले तीन महत्त्वाचे प्रकल्प या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचं काम सरकार करत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे.अभ्युदय नगर, आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन पूनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाला देण्याचा राज्य सरकारचा हट्ट आहे. पूर्वी एक म्हण होती, ‘सारी भूमी गोपाल की’, त्यानुसार ‘सारी मुंबई अदाणी की’ असा सगळा कारभार चाललाय.

ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन, रक्त सांडून मिळवली आहे. आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. त्यामुळे ही मुंबई आम्हीदेखील कोणाला आंदण देऊ देणार नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी आणि अदाणी समूहाला स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या १६ तारखेला (१६ डिसेंबर) शिवसेनेचा प्रचंड मोर्चा काढणार आहोत.

हा मोर्चा धारावीतून अदाणींच्या कार्यालयावर जाईल. त्यामुळे मी धारावीकरांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या जागा बळकावू देऊ नका. कोणी गुंडगिरी केली तर ठाकरे गटाकडे या. आपण या गुंडांना सरळ करू.उद्धव ठाकरे म्हणाले, इतर अनेक ठिकाणी पुनर्विकास करताना लोकांना ४०० ते ५०० चौरस फूटांची घरं दिली जातात. परंतु, धारावीकरांना ३०० चौरस फूटांची घरं देऊ असं सांगितलं जात आहे.

परंतु, धारावीकरांनाही ४०० ते ५०० चौरस फूटांची घरं मिळायला हवीत. योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावं, धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही अथवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडेल. कुठेही दमदाटी चालणार नाही. तुम्हाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेची ताकद रस्त्यावर उतरेल.