इचलकरंजीत भाजपच्या हिंदुराव शेळके यांची ‘तुतारी’ फुंकण्याची तयारी! माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे मौन…….

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात नेतेमंडळींची मोर्चे बांधनी सुरू झालेली आहे. सभा मेळावे यांचे आयोजन करण्यात येत आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्षातून जोरदार सुरू असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. अशातच बंडखोरीच्या चर्चा देखील चर्चेचा विषय बनत आहेत.

इचलकरंजीचे राजकारण नेहमीच आवाडे घराण्याभोवती फिरत राहिले आहे. या मतदारसंघातील सर्व महत्त्वाची पदे शक्यतो आवाडे घराण्याकडे राहिली आहेत; परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी त्यांना दोनवेळा पराभूत केले. पराभूत होईपर्यंत आवाडे यांनी आपले संपूर्ण राजकारण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले. नंतर मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम केला. २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि हाळवणकर यांना पराभूत करून पुन्हा आमदार झाले.

त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यासाठी हाळवणकर हेच त्यांना व्यासपीठावर घेऊन गेले. असे असले, तरी काही क्षणातच हाळवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आवडे पिता-पुत्र भाजपमध्ये आल्यानंतर काही दिवसांत इचलकरंजीतील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते हिंदुराव शेळके यांनी ‘तुतारी’ फुंकण्याचे ठरविले असल्याचे समजते. यावर हाळवणकरांचे मौन मात्र चर्चेचा विषय बनला आहे.