प्रत्येक भागात अनेक स्पर्धा विविध कार्यक्रमानिमित्त घेतल्या जातात. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतो. वस्त्रनगरी म्हणून जाणाऱ्या इचलकरंजी शहरात देखील अनेक स्पर्धा घेतल्या जातात. इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी जलतरण तलावात पोहताना बुडणाऱ्या हनुमंत सुरेश बागडी (रा. चांदणी चौक) या अकरा वर्षांच्या मुलाला प्रशिक्षक उदयसिंह निंबाळकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवण्यात आले.
महानगरपालिकेने नूतनीकरणानंतर पुजारी जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला केला. येथे रविवारी पोहण्याच्या स्पर्धा होत्या. दरम्यान, हनुमंत बागडी याने जलतरण तलावात उडी मारली. तो चार फूट पाण्यात गेला. तेथून पोहताना त्याचा पाय घसरून तो लगतच्या आठ फूट खोलीच्या पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. हे लक्षात आल्यावर प्रशिक्षक निंबाळकर आणि अन्य सहकाऱ्यांनी तलावात उड्या घेऊन त्याला बाहेर काढले. दरम्यान, त्या मुलाचा आणि स्पर्धेचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.