येत्या एक-दोन दिवसात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुका जाहीर करू शकतो. दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोमवारी, निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

मात्र, आज कोणतीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली नाही. त्यामुळे आज निवडणूक जाहीर होणार नाही, हे स्पष्ट आहे. येत्या एक-दोन दिवसात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह 26 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे.

आचारसंहितेचा कालावधी 30 दिवसांचा असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया निकालांसह पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता याच आठवड्यात लागू होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.