इचलकरंजीत डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार; देवदर्शन घेऊन परतताना काळाचा घाला

अलीकडच्या काळामध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर असणारे खड्डे तसेच काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे वाहनांची खूपच वर्दळ आहे. त्यामुळेच वाहनधारकांना खूपच कसरत करावी लागत आहे. अशातच इचलकरंजी शहरांमध्ये झालेल्या विचित्र अपघाताने शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या दांपत्यावर इचलकरंजी मध्ये काळाने घाला घातला आहे. डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे निवृत्त प्रभारी अधिकारी संजय सदाशिव वडिंगे वय 58 व सौ. सुनीता संजय वडिंगे वय 55 राहणार रिंग रोड मंगळवार पेठ या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

आज म्हणजेच सोमवारी सकाळी मंगळवार पेठ परिसरात राहणारे संजय वडिंगे व त्यांच्या पत्नी सौ. सुनीता या पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. तेथून ते मोटरसायकल वरून घरी परतत होते यावेळी बोरगाव कडून इचलकरंजी कडे भरधाव येणाऱ्या डंपर खाली त्यांची मोटर सायकल सापडली. यामध्ये सौ. सुनीता यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर संजय वडिंगे यांच्याही कमरेवरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने इंदिरा गांधी इस्पितळात नेले यानंतर प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. वडिंगे दाम्पत्याच्या या मृत्यूमुळे शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पंचगंगा नदी मार्गावरील यशोदा पुलाजवळ हा अपघात घडला.अपघाताची नोंद करण्याचे काम गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होते. या अपघातामुळे नदीमार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.