निवडणुकीची रणधुमाळी! मविआ आणि महायुतीची आज पहिली यादी येणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने काल याबाबतची घोषणा केली. 20 नोव्हेंबर ला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला निकाल लागेल. त्यामुळे आता सगळेच पक्ष तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज महायुतीची आणि महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसंच ‘स्वराज्य’ पक्षाची आज पत्रकार परिषद होणार आहे. संभाजीराजे छत्रपती माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या घडामोडींना वेग आला आहे. आज महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीचा निवडणुकीचा फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. तसंच उमेदवारांच्या पहिल्या यादीबाबतच लोकांमध्ये उत्सुकता आहे. काल दुपारीच महायुतीची पत्रकार परिषद होती. यातच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती पुढे ढकलण्यात आली.

आता आज सकाळी 11 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होते का? हे पाहावं लागेल.महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे. तिन्ही पक्ष मिळून हे जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच उमेदवारांची पहिली यादी देखील आज येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.