सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या मोहिते पाटील यांच्या माळशिरस या राखीव विधानसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा एकदा विद्यमान आमदार राम सातपुते आणि शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते उत्तम जानकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.गेल्या वेळेला आमदार राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांच्यावर मात करीत माळशिरस चा गड मिळवला होता . मात्र त्यावेळी मोहिते पाटील कुटुंब हे भाजपमध्ये होते आणि मोहिते पाटलांच्या मदतीने भाजपला माळशिरस विधानसभा जिंकता आली होती.
आता यावेळी परिस्थितीत मोठा बदल झाला असून मोहिते पाटील यांनी लोकसभेला भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने आता उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांची मोठी ताकद मिळणार आहे. माळशिरस निवडणुकीत यंदा पाण्याच्या प्रश्नांसोबत बेरोजगारांच्या हाताला काम हे महत्वाचे मुद्दे ठरणार असले तरी जानकर व मोहिते पाटील यांच्या एकत्रित बलाढ्य ताकतीसमोर भाजप राम सातपुते याना कसे निवडून आणणार हा मोठा प्रश्न असणार आहे .
या निवडणुकीत गावोगावी असणारे जानकर विरोधी मोहिते पाटील गटाचे मतदार आणि धनगर समाजाच्या जीवावर सातपुते विजयापर्यंत पोचणार का हेच दिसणार आहे . सध्या भाजप मध्ये असणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिकाही यावेळी महत्वाची ठरणार असून त्यांच्याकडून ऐनवेळी काय निरोप मिळतात यावरही सातपुते यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे . सध्यातरी हि लढाई सातपुते विरुद्ध जानकर अशी नसून ती फडणवीस विरुद्ध शरद पवार अशीच राहणार आहे . त्यामुळे जरांगे व हाके फॅक्टर सोबत पवारांचे डावपेच सरस ठरतात कि फडणवीस यांची रणनीती यावर माळशिरसाचे भवितव्य अवलंबून आहे .