सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष व्यस्त असलेला दिसत आहे. परंतु अजूनही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवार कोण हे निश्चित झालेलं नाही. लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवण्यात आले. दुसरीकडे महायुतीत उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीक शिंदे गटात असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास महायुतीतून विरोध होत आहे.
हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडीने महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. संजय मंडलीक यांचा त्यांच्यासमोर टिकाव लागणे शक्य नाही. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन तेथून आपला उमेदवार देण्याची चर्चा सुरू आहे.
मंडलीक यांच्याऐवजी समरजित घाडगे यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंडलीक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन करून मला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचा दावा केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माझं तिकीट कापले जाणार ही केवळ अफवा असून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होत असल्याने उमेदवारी घोषित करण्यासाठी थोडा उशीर होत आहे. मात्र पुढील काही तासांमध्ये उमेदवारी घोषित केली जाईल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.
