15 दिवसांची कोठडी स्थगित, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आज माझगांव कोर्टात सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे स्वत: आपले भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यासोबत कोर्टात हजर झाले होते. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील सुनावणीसाठी उपस्थित होते.

यावेळी कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने याआधी राऊतांना 15 दिवासांची कोठडी सुनावली होती. पण ती शिक्षा देखील आता कोर्टाकडून स्थगित करण्यात आली आहे. खरंतर संबंधित प्रकरणावर कोर्टात काल सुनावणी होणार होती. पण काही कारणास्तव ती आज झाली. संजय राऊत स्वत: या सुनावणीला उपस्थित होते. या प्रकरणात 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 31 जानेवारी 2025 ला होणार आहे.