हातकणंगलेत महायुतीत मिठाचा खडा, शिंदेसेना आक्रमक

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने राजू आवळे यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला. परंतु महायुतीतील संभ्रम वाढतच चालला आहे.शिंदेसेनेने मतांची बेरीज समोर ठेवून उमेदवारीचा हट्ट धरला आहे. शेवटच्या टप्प्यात गुंतागुंत वाढल्याने अखेर आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी जनसुराज्य पक्षाची उमेदवारी अशोकराव माने यांना जाहीर केली. इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा अलका स्वामी व माजी आमदार सुजित मिणचेकर यांची नावे शिंदेसेनेकडून पुढे आली आहेत.

करवीरमध्ये कोरे यांनी जनसुराज्यचा उमेदवार उतरविल्याने शिंदेसेना हातकणंगलेसाठी आक्रमक झाल्याने महायुतीच्या एकीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.हातकणंगले मतदारसंघात अशोकराव माने यांनी जनसंपर्क ठेवल्याने तेच महायुतीचे उमेदवार असतील, असा होरा होता.परंतु गेल्या चार-पाच दिवसात महायुतीत नव्या घडामोडी सुरू झाल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाने ही जागा मिळविण्यासाठी जोर धरला असून अलका स्वामी यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जनसुराज्य व भाजपामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.