‘हा’ आजार का ठरतोय जीवघेणा? सिद्धार्थ शुक्लापासून ते… अनेक कलाकारांनी गमावला जीव

 देशभरात दिवाळी धुमधडाक्यात सुरू असताना बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीवर एका बातमीमुळे शोककळा पसरली आहे. जगभरात फॅशन डिझायनर म्हणून नावलौकीक कमावलेले रोहित बल यांचं वयाच्या 63व्या वर्षी निधन झालं. त्यामुळे बॉलिवूडसह फॅशन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून रोहित यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यावर त्यांचे उपचारही सुरू होते. पण शुक्रवारी दिल्लीच्या अश्लोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांना अटॅक आल्याचं सांगितलं जातं. हाच आजार टीव्ही कलाकार सिद्धार्थ शुक्ला, गायक केके आणि अभिनेता विकास सेठी यांनाही होता.

रोहित बल हे देशातील एक नामांकित फॅशन डिझायनर होते. ते फॅशन कौन्सिलिंग ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्यही होते. गेल्या काही वर्षापासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं. गेल्या वर्षी त्यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणाही झाली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅकही केलं होतं. कमबॅकनंतर लॅक्मे इंडिया फॅशन विक हा त्यांचा अखेरचा शो ठरला. डॉक्टरांच्या माहितीनुसार कार्डियक अरेस्ट गंभीर आजारांपैकी एक आहे. हृदयाची धडधड अचानक बंद झाल्यावर कार्डियक अरेस्ट येतो. मेंदू आणि शरारीच्या इतर भागातील रक्त पुरवठा थांबल्यावर व्यक्ती बेहोश होतो. या परिस्थितीत तात्काळ उपचार मिळाला नाही तर मृत्यू होऊ शकतो.

छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं ही कार्डियक अरेस्टची लक्षणे आहेत. अनियमित किंवा वेगाने हृदयाची धडधड होणे, घाबरल्यासारखं वाटणं, उल्टी होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे ही कार्डियकची लक्षणे आहेत. कार्डियक अरेस्ट येण्याच्या काही तास आधी ही लक्षणे जाणवतात. हृदयाची लय बिघडल्यावर हे लक्षणे जाणवतात.

याच आजाराने हे कलाकार गेले

सिद्धार्थ शुक्ला : काही वर्षापूर्वी टीव्ही कलाकार सिद्धार्थ शुक्ला यांचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील कुपर रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बिग बॉस 13 चे ते विजेते होते.

विकास सेठी: 8 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध टीव्ही कलाकार विकास सेठी हे सुद्धा हृदयविकाराने गेले. त्यांनी ‘सास भी कभी बहू थी’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या लोकप्रिय सीरियलमध्ये काम केलं होतं. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

सिंगर केके : फेमस सिंगर कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके यांचा मृत्यू 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या मुख्य कोरोनरी धमनीसह इतर धमन्या आणि उपधमन्यांमध्ये रक्तप्रवाह थांबला असल्याचं सांगितलं जातं.

तर अशा पद्धतीने जर यांपैकी कोणेतही लक्षण आढळून आली किंवा त्रास व्हायला लागला की वेळ न घालवता जवळपासच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात धाव घेणेच योग्य राहिलं. त्यामुळे अशा कोणत्याही लक्षणांकडे दूर्लक्ष करणे महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच सावधानता बाळगून डॉक्टरांना फोन करून किंवा जवळपास असलेल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेणे चांगले.