हातकणंगले मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ

निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड जनसंपर्क, कोट्यवधीची विकासकामे करावी लागतात. बारशापासून बाराव्यापर्यंत हजेरी लावावी लागते. वास्तुशांतीला जावं लागतं. पदं द्यावी लागतात; परंतु याही पुढे जाऊ ‘साम, दाम, दंड, भेद’ वापरताना काही तंत्रेही अवगत करावी लागतात.यातील एक म्हणजे रिंगणात एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करणे, त्यांच्या चिन्हांमुळे गोंधळ होऊन मतविभागणी व्हावी, यादृष्टीनेही जोडण्या घालाव्या लागतात.

कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, हातकणंगले आणि इचलकरंजी येथे हा खेळ करण्यात आला आहे. हातकणंगले मतदारसंघात आवळे राजू (बाबा) जयवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्ह हात असताना आणखी एक आवळे शिवाजी महादेव (अपक्ष), चिन्ह बॅट घेऊन निवडणूक लढवत आहेत. जनसुराज्य शक्तीचे दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) हे नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवत असताना अपक्ष अशोक तुकाराम माने यांनी झोपाळा हे चिन्ह घेऊन लढण्याचे ठरवले आहे.

मतदार मतदानाआधीच प्रक्रिया करून आता गेला की थोडा भांबावतो. यंत्रावरील मतपत्रिका पाहिली की त्याचा गोंधळ उडतो. याच मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी एकाच नावाचे, आडनावाचे उमेदवार रिंगणात उतरवणे, चिन्हांमध्ये साम्य दिसून गोंधळ होईल, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आता उमेदवारांना चिन्हावरच भर द्यावा लागणार आहे.