आळते (ता. हातकणंगले) हद्दीत हातकणंगले – वडगांव रोड वर मदरसा नजीक भरघाव मोटारसायकलस्वाराने जोराची धडक दिल्याने विजय पारीसा कनवाडे ( वय ६५ मुळगांव आळते सध्या रा. जवाहरनगर इचलकरंजी) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत घटना स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विजय कनवाडे यांची आळते येथे वडीलोपार्जीत शेती आहे. इचलकरंजीहून आळते येथे शेतीची कामे करण्यासाठी कनवाडे हे एस टी बसने येतात. शनिवारी दुपारीही शेताकडे जाण्यासाठी कनवाडे हे इचलकरंजी हुन आळतेकडे एस टी बसने आले होते.
ते शेतीचे काम आटोपून परत इचलकरंजी येथील घरी जाण्यासाठी येथील हातकणंगले – वडगांव रोडवरील मदरसा येथील बस थांब्यावर जात असताना हातकणंगलेहून वडगांवच्या दिशेने मोटारसायकल ( एम एच ०९ जी आर १४७० ) वरून निघालेल्या अथर्व ठाणेकर व प्रथमेश पाटील यांनी जोराची धडक दिल्याने विजय कनवाडे हे गंभीर जखमी झाले होते, उपचारास नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर मोटार सायकलवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.