वन विभागाचे संचारी पथक तसेच लोंढा व नागरगाळी वन विभागाच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सुवातवाडी (ता. खानापूर) येथे 67 गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी या बॉम्बचा वापर केला जात होता.अमूल पी. (वय 19, रा. शिमोगा) आणि अनिल मारुती पाटील (वय 49, रा. सुवातवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अमूल हा शिमोगा येथील आदिवासी तांड्यातील रहिवासी आहे. गुरुवारी सुवातवाडीजवळ शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवून परत येत असताना अमूलची हालचाल संशयास्पद वाटल्याने वन विभागाच्या कर्मचार्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याजवळ काही गावठी बॉम्ब आढळून आले.
अधिक चौकशी केल्यानंतर अनिल पाटील यांच्या सांगण्यावरून शिकारीच्या उद्देशाने बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे अनिल पाटील यांनाही अटक करण्यात आली. ते महाराष्ट्रात सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संचारी पथकाच्या एसीएफ कविता इरनट्टी, नागरगाळीचे एसीएफ शिवानंद मगदूम, आरएफओ तेज वैद्य, आरएफओ पुरुषोत्तम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.चार वर्षांपूर्वी माचीगडजवळ शिकारीसाठी गावठी बॉम्ब घेऊन जाताना प्रचंड स्फोट होऊन एकाचा जीव गेला होता.
तेव्हापासून गावठी बॉम्बचा वापर करणार्यांवर वनविभागाने करडी नजर ठेवली आहे. गावठी बॉम्बला बकर्याचे मांस गुंडाळून ते उघड्यावर टाकले जाते. मांसाच्या वासाने रानडुक्कर व अन्य प्राणी त्याला तोंडात घेऊन चावण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात बॉम्बचा स्फोट होऊन प्राण्याचा बळी जातो. तथापि बर्याचदा जंगलात जाणारे गुराखी व शेतकरी तसेच पाळीव जनावरांच्या जीवाला या बॉम्बमुळे धोका निर्माण होतो.