इचलकरंजी महानगरपालिकेला पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा तोडण्याची नोटीस

इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. पाणी उपसापोटी महानगरपालिका प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी बिल देत असते. मात्र, घरगुती व औद्योगीक बिल चुकीच्या पध्दतीने आकारले जात असल्याच्या कारणावरून बीलाच्या संदर्भात तफावत असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेची पाटबंधारे विभागाकडे तब्बल २३ कोटी रुपये थकबाकी दाखवण्यात येत आहे. 

राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून इचलकरंजी महानगरपालिकेला पाणी उपसाचे बिल आदा न केल्यामुळे पाणीपुरवठा का तोडू नये अशा आशयाची नोटीस लागू केली आहे. दरम्यान, महानगरपालिकेने थकीत बिलापोटी १ कोटी ६४ लाख रूपये आदा केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. प्रत्येक वर्षी महानगरपालिकेच्या वतीने पाटबंधारे विभागाला पाणी उपसापोटी रक्कम आदा केली जाते.

बिलाच्या तफावत संदर्भातही अधिकारी पातळीवर वारंवार बैठकाही झाल्या असून त्यामध्ये मार्ग निघालेला नाही. त्यामुळे हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून सोडवावा. जितका पाण्याचा उपसा केला जातो त्याच प्रमाणात पाटबंधारे विभागाने बिल आकारावे या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.