तुम्हीही ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतात वाहतुकीचे कडक नियम लागू आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, ज्यामध्ये दंडापासून तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. देशात ड्रायव्हिंगबाबत कडक नियम आहेत. मात्र, तरीही अनेकांचे त्याकडे लक्ष नाही.
नियम न पाळल्याबद्दल चलन काढल्यास आणि वेळेवर न भरल्यास वाहतूक पोलिस किंवा वाहतूक विभाग मोठी कारवाई करेल. जर तुम्ही तुमच्या वाहनाचे किंवा दुचाकीचे चलन वेळेवर जमा केले नाही, तर ९० दिवसांनंतर, म्हणजे चलन कापल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर, तुमचे वाहन वाहन पोर्टलवर ‘नॉट टू बी ट्रान्झॅक्टड’ श्रेणीत टाकले जाईल.
चलन न भरल्यास वाहन पोर्टलशी संबंधित परिवहन विभागाच्या सर्व सेवा ब्लॉक केल्या जातील. या सेवांमध्ये वाहन फिटनेस तपासणी, प्रदूषण तपासणी, वाहन हस्तांतरण आणि पत्ता बदल यांचा समावेश आहे. या सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी, चलन भरावे लागेल.
प्रलंबित चलनात लक्षणीय वाढ झाली असून, ही बाब लक्षात घेऊन ही कडक कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खरंतर हा नियम पूर्वीपासून होता. पूर्वी हे काम मॅन्युअल होते, ज्यात खूप वेळ लागत होता. पण आता ते स्वयंचलित होईल. हा निर्णय म्हणजे वाहनचालकांना रस्त्यावरील नियमांचे पालन करून वेळेवर चलन भरण्याचा इशारा आहे. तसे न केल्यास त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.