PM मोदींनी कोल्हापूरकरांना दिली दिवाळीची ‘ही’ खास भेट

केंद्र सरकारकडून पीएम ई बस सेवा प्रकल्पांतर्गत केएमटीसाठी शंभर ई-वातानुकूलित बस मंजूर झाल्या आहेत. आजच मंजुरीचे पत्र आले असून दोन महिन्यात या बस येतील. त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी केएमटीवर नसून व्यवस्थापन मात्र करता येणार आहे,’अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कोल्हापूरकरांना दिवाळीची भेट दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘नवीन वर्षात येणाऱ्या या बस सांगली, मिरजपर्यंत धावतील. त्यांना हद्दीची मर्यादा असणार नाही. तिकिटाचे व्यवहार डिजिटल प्लॅटफॉर्मवरून होतील तसेच विमानतळासाठी दोन बस कायम धावतील’, असा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार महाडिक म्हणाले, ‘पीएम ई बस सेवा प्रकल्पात केएमटीने १०० बसचा प्रस्ताव सादर केला होता. ३० ऑक्टोबर २०२३ ला प्राथमिक बैठक झाली. काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत पार्किंगची जागा, चार्जिंग सुविधा, २३ केव्ही वीजपुरवठ्याची व्यवस्था, मेकॅनिक्स यांच्या उपलब्धतेबाबत विचारणा केली होती. महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आज १०० ई बसच्या मंजुरीचा आदेश केंद्रीय मंत्रालयाने काढला.

४० लाख किंमतीची एक बस असून ४० कोटी खर्च होणार आहेत.’ मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी हा प्रश्‍न २४ डिसेंबरआधीच निकाली निघेल. तसेच महायुतीच्या सरकारसाठी पुढील १५-२० वर्षात काही अडचण नाही, असेही सांगितले. पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते.

तयार असलेल्या गावांनिशी हद्दवाढ व्हावी

‘शहराशेजारील जी ८-९ गावे हद्दवाढीसाठी तयार आहेत, त्यांना घेऊन हद्दवाढ करावी. त्या गावांत सुविधा दिल्यानंतर इतर गावे आपोआपच सहभागी होतील. अनेक गावात विरोध असेल तर चर्चा करून त्यांना महत्व समजून सांगावे लागेल. लोकप्रतिनिधींचा विरोध म्हणजे तेथील नागरिकांचे मत असते. ते त्यांचे वैयक्तिक मत नसते’, असे मत महाडिक यांनी व्यक्त केले.

१९० कोटींत शहरातील रस्ते चकचकीत

‘शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारने शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात आणखी ९० कोटी मंजूर होतील. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते चकचकीत होतील’, असे महाडिक यांनी सांगितले.