सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान विभागाच्या संकेत स्थळावरील अनुमानानुसार शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.हा पाऊस सर्व भागात नसला तरी ढगाळ वातावरण मात्र सर्वत्र राहणार आहे. डाळिंब व द्राक्ष बागांसाठी ढगाळ वातावरण हे अत्यंत घातक आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख हेक्टर तूर पीक आहे. हे पीक सध्या फुलोऱ्यात असून घाटेआळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ माळशिरस या तालुक्यांसह शेजारील जत, आटपाडी, विटा दहिवडी येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
माढा, बार्शी, करमाळा, परांडा -भूम, इंदापूर, बारामती, दौंड परिसरात ढगांची निर्मिती झाली तर रिमझिम पावसाची शक्यता आहे. मात्र, या भागात पाऊस कमी राहील असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.