पवारांचा आदेश म्हणत मोहिते पाटील उतरले डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या प्रचारात

महाविकास आघाडीत सांगोला विधानसभा मतदारसंघ अनपेक्षितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आणि सर्वांचे अंदाज चुकले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रमाणिक साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या पदरी निराशा पटली.ठाकरेंनी राष्ट्रवादीतून आलेले दीपक साळुंखे यांना मैदानात उतरविले, तर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे एकटे पडलेले डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेकापकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

आता एकाकी लढाईत उतरलेले देशमुख यांच्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे सांगोल्याच्या रिंगणात उतरले असून आपण पवारांच्या आदेशानुसार प्रचाराला आल्याचे ते सांगत आहेत.महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे देशमुखांच्या प्रचाराला कोण येणार, असा सवाल विचारला जात होता. त्यातच दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी पवारांनी आपल्याला कामाला लागा, असे म्हटल्याचे सांगितले. त्यामुळे पवार कोणाच्या पाठीशी उभे राहणार, याची उत्सुकता होती.

लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची जाणीव ठेवून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अखेर डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारात उतरले आहेत. गेली दोन दिवसांपासून ते देशमुख यांचा प्रचार करत आहेत. खासदार मोहिते पाटील यांनी बुधवारी दिवसभर सांगोल्यात तब्बल सात सभा घेतल्या, तर आजही त्यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला आहे.