राज्याचं लक्ष लागलेल्या इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघात यंदा लक्षवेधी लढत होणार आहे. सातवेळा निवडून आलेले जयंत पाटील यंदा आठव्यांदा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. इस्लामपूर-वाळवा म्हणजे जयंत पाटलांचे होमग्राऊंड. या ठिकाणी कारखाना आणि अनेक सहकारी संस्था उभा करून जयंत पाटलांनी आपलं राजकीय नेटवर्क बळकट केलंय. सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हजारो रोजगार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचा फायदा जयंत पाटलांना होतोय. त्या बळावरच जयंत पाटील हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतात.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांसोबत कायम राहिले. जयत पाटील हे शरद पवारांसोबत राहिल्याने आणि त्यांची बाजू सांभाळल्याने ते अजित पवारांच्या टार्गेटवर असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच अजित पवारांनी जयंत पाटलांच्या मतदारसंघात प्रचार सभेचा धडाका लावल्याचं दिसतंय. पण अजित पवारांच्या सभांचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असा जयंत पाटलांचा दावा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तर जयंत पाटील हे मुख्यमंत्री होतील या आशेने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचं दिसतंय.