गणेशोत्सवासाठी शासकीय यंत्रणा सतर्क

 इचलकरंजी,पुढील आठवड्यात साजरा होणारा गणेशोत्सव सर्वांना मंगलमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात यावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी योग्य पध्दतीने समन्वय साधून काम करावे. त्याचबरोबर शहरातील गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती तातडीने करण्यासह श्री मूर्तीना अडथळा निर्माण होत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.

 आगामी गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन शहरवासीयांना अत्यंत आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, पोलिस, महसूल प्रशासन यासह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून करणेत आलेल्या सूचनांचे अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण होत असलेल्या विद्युत तारांची उंची आवश्यकतेनुसार वाढविण्यासाठी एमएसईबी प्रतिनिधी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेशी समन्वयक साधून कार्यवाही करणेच्या सुचना दिल्या.

गणेशोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक देखावे तसेच गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या.

बैठकीसाठी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, तहसिलदार महेश खिल्लारी, सहा. आयुक्त विजय राजापुरे, विकास खोळपे, महेंद्र क्षिरसागर, आरती खोत, डॉ. भाग्यरेखा पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सचिन सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता वैभव गोदिल, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, बाजी कांबळे, प्रसाद अवघडे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि प्रशांत निशानदार, इसरार बेग, डॉ. प्राची ढाले, परिवहन महामंडळाचे सागर पाटील, सुनील शिंदे, सुनिल बेलेकर, सुजाता दाभोळे व नितिन बनगे, राजेंद्र बावणे, संजय कांबळे, विजय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.