विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दिवस राहिले आहेत. प्रचारासाठी वेगवेगळे फंडे उमेदवारांकडून अजमावले जात आहेत. प्रचारासाठी नेते आणि कार्यकर्ते दिवसरात्र पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत.दरम्यान, कोल्हापुरात कागलमध्ये मविआच्या उमेदवाराच्या प्रचारपत्रिकेचा वापर करून करणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जैन्याळ गावात हा प्रकार घडला आहे. कागलमध्ये मविआकडून शरद पवार गटाचे समरजितसिंह घाटगे आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे हसन मुश्रिफ हे उमेदवार आहेत.
कागल तालुक्यातील जैन्याळ गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या फोटो असलेल्या पांपलेटवर करणी करण्याचा प्रकार आढळला. गावाच्या बाहेरील बाजूला असलेल्या कडाणीचा ओढा या ठिकाणी या पांपलेटवर तांदूळ नारळ ब्लाउज पीस अर्धा कापलेला लिंबू अंगारा असे साहित्य आज सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांना दिसले.
समरजित घाटगे यांची प्रचारपत्रिका आणि त्यावर नारळ, ब्लाउज पीस, लिंबू इत्यादी साहित्य असल्याची माहिती नागरिकांना समजली. त्यानंतर समरजितसिंह घाटगेंचे समर्थक माजी उपसरपंच संजय बरकाळे हे घटनास्थळी आले. त्यांनी हे साहित्य विस्कटून लावले व पुरोगामी महाराष्ट्रात असा करणी-बाधेचा प्रकार खपवून घेणार नाही. ग्रामपंचायत असो किंवा अन्य निवडणुकांमध्ये याआधीही असे प्रकारे या ठिकाणी केल्याचे बरकाळे यांनी सांगितले.
बरकाळे म्हणाले की, जैन्याळ गावात फोटोवर करणी केलीय. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा गोष्टींना नष्ट करण्याची वेळ आलीय. हसन मुश्रीफसाहेब अशा गोष्टींना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असे कर्मकांड होतायत ते नष्ट केले जातील असं समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं.
