आर्थिक देवाणघेवाणीतून खवासपूरमध्ये भावकीतील एकाचा निर्घृण खून 

आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून भावकीतील एकाने डोळ्यात चटणी टाकून ३८ वर्षीय इसमाचा तीक्ष्ण हत्यार किंवा दांडक्याने डोक्यात वार करून खून केला. ही घटना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास उंबराची ताल, लांड्या महादेव मंदिराजवळ खवासपूर (ता. सांगोला) येथे घडली. किरण ज्ञानेश्वर यादव (वय ३८, रा. यादव वस्ती, खवासपूर, ता. सांगोला) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत भाऊ दीपक ज्ञानेश्वर यादव यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर खून प्रकरणी आरोपी अरविंद विष्णू यादव (वय २५) यास अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले. याबाबत किरण यादव व आरोपी अरविंद यादव यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता. दरम्यान, शनिवारी १६ रोजी रात्री ७:३० च्या सुमारास किरण याने खवासपूर गावातील अनिकेत यादव यांच्या दुकानातून दुचाकीवरून घराकडे निघाला होता.

वाटेत यादव वस्तीकडे जाणाऱ्या उंबराची ताल, लांड्या महादेव मंदिर जवळ अगोदरच दबा धरून बसलेल्या आरोपीने किरण यांच्या डोळ्यात व अंगावर चटणी टाकून तीक्ष्ण हत्याराने डोक्यात घाव घालून खून करुन तिथून धूम ठोकली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पती किरण घराकडे परतले नाहीत, म्हणून पत्नीने रात्रभर त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता तो उचलला नाही. रविवारी (दि. १७) सकाळी ९ वाजता गावातील एक तरुण शेतात मोटार चालू करण्यासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला शेतात कोणीतरी मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्याने किरण यादव यांच्या खुनाची घटना उघडकीस आली.