सांगोला मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया…

काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक मतदारसंघामध्ये चुरशीचे मतदान पाहायला मिळाले. 253 सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी अगदी ग्रामपंचायती निवडणुकीप्रमाणे अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर थंडीची लहर जाणवत असताना देखील निवडणुकीचे वातावरण तापलेले होते. यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

युवा, तरुण मतदारांबरोबरच वयोवृद्धानी देखील मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर निवडणूक विभागाकडून पाळणाघर, आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यात आलेल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. राजुरी, लक्ष्मीनगर, तरंगेवाडी, जवळा, आगलावेबाडी, सांगोला, बागलवाडी, एखतपुर, सोनलवाडी, भाळवणी आणि महीम या केंद्रातील रात्री ९:१५ पर्यंत उशिरापर्यंत मतदान चालू होते आणि जवळा येथील मतदान रात्री ९:३० वाजेपर्यंत व राजुरी येथील मतदान हे 10: 29 पर्यंत सुरू होते.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी ३ लाख ३३ हजार ४९३ मतदार होते. यापैकी २ लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. सांगोला तालुक्यात रात्री साडेदहापर्यंत सरासरी ७८.१४ टक्के मतदान झाले.सांगोला मतदार संघासाठी १ लाख ७२ हजार ७०४ पुरुष, १ लाख ६० हजार ७८४ महिला असे एकूण तीन लाख ३३ हजार ४९३ मतदार आहेत यापैकी रात्री साडेदहा वाजेपर्यंत १ लाख ३६ हजार २३६ पुरुष व १ लाख २४ हजार ३५२ महिला इतर एक असे 2 लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात सरासरी ७८.१४ टक्के मतदान झाले.