खानापूर मतदारसंघात बंडखोरीचा परिणाम किती?  ‘टेंभू’चा मुद्दा चमत्कार घडविणार का ? महायुतीची लाडकी बहीण की, महाविकास आघाडीची पंचसूत्री सरस ठरणार?

खानापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्यानंतर महायुतीने शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. त्यामु‌ळे मतदारसंघात अनिल बाबर यांच्या सहानुभूतीने ही निवडणूक बाबर यांच्यासाठी सोपी जाईल, असे सुरुवातीचे अंदाज होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून अॅड, वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यात यश आले.

मात्र, राजेंद्र देशमुख यांनी बंडखोरी केल्याने पुन्हा दोन्ही उमेदवारांच्या एकास एक लढतीचे गणित बिघडले. खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी झाल्याने येथे तिरंगी लढत झाली. महायुतीतून शिवसेनेचे सुहास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अॅड. वैभव पाटील व बंडखोर अपक्ष माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख या तिघांतच प्रमुख लढत झाली. त्यामुळे बंडखोर अपक्ष देशमुख यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार तसेच प्रचारात कळीचा मुद्दा ठरलेली टेंभू योजना चमत्कार घडविणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तर महायुतीची लाडकी बहीण की, महाविकास आघाडीची पंचसूत्री या मतदारसंघात सरस ठरणार? याचे उत्तर शनिवारी मिळणार आहे.  प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर प्रामुख्याने महायुतीचे सुहास बाबर यांनी टेंभूचा मुद्दाच जास्तीत जास्त चर्चेत आला. परंतु, विरोधी महाविकास आघाडीने हा मुद्दा खोडून काढताना आघाडीचे उमेदवार अॅड. वैभव पाटील यांनी या योजनेचे श्रेय एकाचेच नसून अनेकांनी यात योगदान दिल्याचा उल्लेख सभांमधून केला. 

या मतदारसंघात बाबर यांनी विकास कामांचे व्हिजन सांगत दिवंगत आ. अनिलभाऊ बाबर यांनी केलेल्या विकास कामांचाही लेखा-जोखा घेतला. त्यावेळी त्यांनी भावनिक साद घालत मतदान करण्याचे आवाहन केले. तर सदाशिवराव पाटील यांची साथ लाभलेल्या वैभव पाटील यांनी विरोधी उमेदवारांनी दहा वर्षात संस्था उभ्या केल्या का, असा सवाल करीत निवडणुकीत वातावरण निर्मितीसाठी भावनिक प्रचार आता चालत नसल्याचाही उहापोह केला. अपक्ष राजेंद्र देशमुख यांनी आटपाडीच्या तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करीत माणगंगा कारखानाही सुरू करणार असल्याचा सांगितले.

त्यातच आमदार जयंत पाटील यांनी माणगंगा कारखान्याचे धुराडे मीच पेटविणार असल्याचा उल्लेख केल्याने अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुखांच्या बंधूंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.  वैभव पाटील यांना प्रचाराच्या मध्यंतरीच्या काळात पडळकर बंधूंनी ताकद देण्याचा निर्णय पडद्यामागून घेतल्याने उमेदवार वैभव पाटील यांना चांगलेच चार हत्तीचे बळ मिळाले. विसापूर सर्कलमधूनही महाविकास आघाडीला चांगली मदत झाल्याचे दिसले.