इस्लामपूर मतदारसंघात काट्याची लढत असल्याचे चित्र आहे. सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमुळे गल्लीबोळातील माजी नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्त्यांना प्रदीर्घ काळानंतर पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. शनिवार दि. २३ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. परंतु विधानसभा निवडणूक निकालानंतर शहरातील वेगवेगळ्या गटनेत्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे.
सध्यातरी शहरात आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे खमके नेतृत्व नाही, तर विरोधी तत्कालीन विकास आघाडीकडेही अशीच अवस्था आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील गल्लीबोळातील सर्वच नेत्यांना पालिका निवडणुकीचे वेध लागणार आहेत. यामध्ये आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली विविध गट आहेत. यामध्ये अॅड. चिमण डांगे यांच्या नेतृत्त्वाखाली डांगे गट, खंडेराव जाधव यांचा गट आणि विजयभाऊ पाटील यांच्यानंतर या गटाचे नेतृत्व शहाजी पाटील की, संदीप पाटील यावर अद्याप निर्णय नाही. त्यामुळे शहरात दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्यानंतर खमक्या नेतृत्त्वाचा आजही अभाव आहे.
अशीच अवस्था गत पालिका निवडणुकीत स्थापन झालेल्या विकास आघाडीची आहे. अगोदरच भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रमभाऊ पाटील यांचे वेगवेगळे गट आहेत. महाडिक गटाचे नेतृत्व कपिल ओसवाल करत आहेत. शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांचा सवतासुबा आहे. त्यातच आता नव्याने राष्ट्रवादी अजित पवार गटात जयवंत पाटील यांचा गट सामील झाला आहे. आनंदराव पवार यांनी तालुक्याची जबाबदारी केदार पाटील यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे सध्यातरी विकास आघाडीमधील जनतागाडी विविध गटनेत्यांनी खचाखच भरली आहे. त्यामुळेच नियोजित विकास आघाडीकडे अद्याप खमके नेतृत्व नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच गटनेत्यांच्या अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे.