इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीच्या दोन्ही विद्यमान आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघांत महायुतीकडून लढण्यास कोण उमेदवार असतील, यावर आजपर्यंत तरी शिक्कामोर्तब झालेले नाही.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी केली आहे. मात्र अलीकडे या जागेवर शिंदे सेनेच्या गौरव नायकवडी, आनंदराव पवार यांनी हक्क सांगितला आहे, तर शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेवर एकास एक किंवा तिरंगी अशी लढत ठरेल.
या ठिकाणी मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात सम्राट महाडिक व सत्यजित देशमुख या भाजपच्या दोन नेत्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे, तर मानसिंगराव नाईक यांचा कोणत्या राष्ट्रवादीकडे कल असेल, यावरून आणखी एखादा इच्छुक उमेदवार ऐनवेळी रणांगणात असेल, असे दिसते.आता परत एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटलांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आले होते. त्यानुसार निशिकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून आपली तयारी सुरू ठेवली आहे.सदाभाऊ खोत आमदार झाल्यापासून गेले चार वर्षे तालुक्याच्या राजकारणात सावध भूमिका घेत शांत असलेले गौरव नायकवडी शिवसेनेकडून पुन्हा एकदा संधी मिळाल्यास लढण्यास इच्छुक आहेत. सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार यांच्यासमवेत त्यांचा वावर वाढला आहे.
निशिकांत पाटील यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी उमेदवार,’ असा सर्वांसमक्ष शब्द दिला आहे. मात्र तालुक्यातील जयंत विरोधकांना एकत्र आणण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कान टोचल्याशिवाय पर्याय नाही.