कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यात ही भाजपला मोठे खिंडार पडले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
पक्षप्रवेश करत असताना भाजपने आम्हाला शिवसेनेला विकली आहे. असा आरोप करत त्यांनी भाजपला राम राम ठोकत आगामी विधानसभा निवडणुकीला उमेदवारीचे संकेत दिलेत.त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील पवार यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.
त्याचबरोबर मंत्री सुरेश खाडे यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि भाजपचे नेते मोहन व्हनखंडे देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे.आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून संभाव्य उमेदवार म्हणून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना उमेदवारीचे संकेत आहेत.
त्यामुळे भाजपचे नेते राजेंद्र देशमुख यांची गोची झाल्यानंतर त्यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत थेट पक्ष प्रवेश करत भाजपला रामराम ठोकला आहे. कोल्हापूर पाठोपाठ भाजपला (BJP) ही खिंडार पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय बनला आहे.