सांगली जिल्ह्यात महायुतीची जोरदार मुसंडी…

विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीला ५, तर महाविकास आघाडीला ३ जागा मिळाल्या. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), जतचे आमदार विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या मताधिक्यात मोठी घट झाली. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. भाजपने सर्वाधिक ४ जागा जिंकून ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ बनण्याचा मान पटकावला आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला यावेळी दोन जादा जागा मिळाल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने २ जागा जिंकल्या. त्यांनी शिराळ्याची जागा गमावली. काँग्रेसने १ जागा जिंकली, तर एक गमावली. शिवसेनेने खानापूरची जागा कायम ठेवली.  शिराळा मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख विजयी झाले. त्यांना १ लाख ३० हजार ७३८ मते मिळाली. त्यांचे विरोधक मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) यांना १ लाख ८ हजार ४९ मते मिळाली. देशमुख यांना २२ हजार ६८९ मताधिक्य मिळाले.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांना १ लाख २८ हजार ४०३ मते मिळाली, राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना १ लाख ७५९ मते मिळाली. रोहित पाटील हे आर. आर. पाटील यांचे चिरंजीव असून त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यावर २७ हजार ६४४ मतांनी विजय मिळवला. पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांना १ लाख ३० हजार ७६९ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना १ लाख ७०५ मते मिळाली. डॉ. कदम हे ३० हजार ६४ मतांनी विजयी झाले.

सांगली मतदारसंघात भाजपचे सुधीर गाडगीळ यांना १ लाख १२ हजार ४९८, तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना ७६ हजार ३६३ मते मिळाली. काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना ३२ हजार ७३६ मते मिळाली. गाडगीळ ३६ हजार १३५ मतांनी विजयी झाले. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. मिरजमध्ये भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना १ लाख २९ हजार ७६६ मते मिळाली. शिवसेनेचे (उबाठा) तानाजी सातपुते यांना ८४ हजार ५७१ मते मिळाली. भाजपचे खाडे ४५ हजार १९५ मतांनी विजयी झाले.