कोल्हापुरात ‘अजिंक्यताऱ्या’चे हात बळकट; भाजपला सतेज पाटलांचाच धोका

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विरोधक शिल्लक न ठेवण्याचा चंग बांधला आहे.मात्र, भाजपसमोर विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे.बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी उर्वरित साडेतीन तालुक्यात आपली ताकद निर्माण केल्याने अजिंक्यताराचे हात बळकट झाल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ हे युतीत असल्याने भाजपला या लोकसभेत सतेज पाटील यांचाच धोका जास्त आहे.

काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाची भुरळ जिल्ह्याला पडलेली आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची पकड मजबूत होत आहे. जिल्हाध्यक्ष पद हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे हात जिल्ह्यात बळकट झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस संपुष्टात आली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात चार काँग्रेसचे आमदार निवडून आले, तर विधान परिषदेत स्वतः आणि जयंत पाटील-आसगावकर यांना निवडून आणण्यात यशस्वी झाले.

गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक तालुक्यात लक्ष देत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. राजाराम कारखाना वगळता गोकुळ, जिल्हा बँक, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. सहकारात संचालक पेरल्याने प्रत्येक तालुक्यात एक विशिष्ट गट त्यांनी कार्यरत केला आहे. शिवाय बिद्रीच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ओळखून नेतृत्व करण्याची संधी दिली.

आमदार सतेज पाटलांचा सात वर्षांच्या पालकमंत्री पदाचा अनुभव लक्षात घेतला तर त्यांनी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. कार्यकर्त्यांचे विशेष गट तयार केले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हाच गट सत्ताधाऱ्यांना अवजड जाणार आहे. तालुका तालुक्यात गट तयार केल्याने भाजपसह शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी वाढणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आमदाराने आपल्या मतदारसंघापुरतेच राजकारण मर्यादित ठेवले होते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोठी संधी आली होती. त्यांनी काहीसा प्रयत्न केला; पण जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणासाठी त्यांनी ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’ वगळता इतर तालुक्यांत लक्ष दिले नाही. तेथील दुसऱ्या पक्षाचे नेते दुखावतील या भीतीपोटी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. सतेज पाटलांनी मात्र काँग्रेसचे चार विधानसभेचे व दोन विधान परिषदेचे आमदार निवडून आणत, नेतृत्वाची चुणूक हायकमांडला दाखवली.