इस्लामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने संभुआप्पा- बुवाफन यात्रेनिमित्त पेठ – सांगली रस्त्यावरील ख्रिश्चन बंगला परिसरात रविवारपासून जनावरांचा बाजार आणि प्रदर्शनाला सुरुवात झाल्याची माहिती सभापती संदीप संपतराव पाटील यांनी दिली. संपतराव पाटील म्हणाले, प्रतिवर्षीप्रमाणे संभूआप्पा-बुवाफन यात्रेनिमित्त गुरुवारी 28 नोव्हेंबरपर्यंत जनावरांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून सर्वोत्कृष्ट बैल, दोन-चार-सहा दाती बैल, उत्कृष्ट बैलजोडी, संकरीत व खिलार गाय, कालवड, म्हैस व रेडा अशा विभागातून जनावरांची निवड केली जाणार आहे.
विजेत्या जनावराच्या मालकास रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन त्याच दिवशी सन्मानित केले जाणार आहे. यात्रेस व जनारावरांच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो तसा यावेळीही मिळेल. यावेळी पाटील म्हणाले, जनावरांच्या बाजारात चारा, पाणी आणि वैद्यकीय सुविधा पशुपालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव हे या उपक्रमाचे संयोजन करत आहेत. यावेळी उपसभापती शिवाजी आफुगडे, डॉ. अशोक पाटील, आबासाहेब पाटील, शंकर मोहिते, संजय लाखे उपस्थित होते.