विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता. मात्र, ज्या महायुती सरकारने योजना आणली व १ जुलैपासून दरमहा १५०० रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखविला.त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील बहुतेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरपर्यंतचा लाभ मिळाला आहे. आता नवीन सरकार सत्तेवर येईल, त्यावेळी डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांतील प्रलंबित लाभ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिलपासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये मिळतील. त्यासंदर्भातील घोषणा आगामी काही दिवसांत होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.