अलीकडच्या काळात चोरीच्या घटनात भरमसाठ वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.विटा येथील खानापूर रोड व कराड रस्ता या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केवळ २० मिनिटात दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसडा मारून लंपास केले. दुचाकीवरून आले दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसडा मारून लंपास केल्याची घटना गुरूवारी दुपारी दोन ते सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास विटा शहराजवळ घडली.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने महिलांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथील मुंबईस्थित महिला सुनीता विक्रम नलवडे (वय ४५) या गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कराड रस्त्याने घरी वडियेरायबाग गावाकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मिरची हॉटेल जवळच्या पुलावर
त्यांच्या दुचाकीच्या बाजूला येऊन नलवडे यांच्या गळ्यातील एक लाख रूपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण व सोन्याची चैन असा ऐवज हिसडा मारून लंपास केला.
दुसऱ्या घटनेत विटा येथील प्रियांका प्रशांत टेके (वय ३२) या खानापूर रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्याने दुपारी खानापूर रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ टेके यांच्या गळ्यातील एक लाख १० हजार रूपये किमतीचे २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसडा मारून लंपास केले. एकाच दिवसात दोन ठिकाणी भरदिवसा चोरट्याने डल्ला मारल्याने महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे.