आष्टा पेठनाका रस्त्यांची दुरावस्था! नागरिकांमधून नाराजीचा सूर…

पेठ सांगली महामार्ग कामांतर्गत आष्टा ते पेठ नाका काम सध्या सुरू आहे. पूर्वीचा जुना रस्ता उखडून टाकलेला आहे. काही ठिकाणी खडी देखील पसरलेली आहे आणि या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. तसेच या मार्गावर धुळीचेही साम्राज्य खूपच आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेची काळजी निर्माण झालेली आहे. आष्ट्यात या मार्गावर चार शाळा आहेत. विद्यार्थ्यांना त्यामुळे खूपच मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे.

तसेच ज्या ज्या ठिकाणी ओढ्यावरती पुलांचे बांधकाम झाले आहे व जिथे चालू आहेत तिथे रस्त्याला स्पीड ब्रेकर प्रमाणे चढ उतार लागत आहेत. या दृष्टीने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात सध्या होत आहेत. काम संथगतीने चालू असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना होत आहे.

लहान मोठे दगड तसेच धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे. तसेच रस्त्याकडेला छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल, हातगाडी, फळ विक्रेते यांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.