आवाडे जनता बँकेतर्फे मदत…..

इचलकरंजी, येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या औरंगाबाद शाखेतील अजय अहिरे हे बँकेच्या सेवेमध्ये शिपाईपदी कार्यरत होते. त्यांचा आजारामुळे मृत्यू झाला. अशा कठीणप्रसंगी त्यांच्या पश्‍‍चात असलेल्या परिवाराला २७ लाखांची मदत केली.

बँक परिवारातील कोणत्याही सेवकाचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्याला कर्मचारी महासंघातर्फे बँकेच्या कर्मचारी सेवकांकडून एक दिवसाचा पगार आर्थिक सहाय्य म्हणून दिला जातो. अशा एक दिवसाच्या पगाराची व बँकेच्या संचालक मंडळाचा एक दिवसाचा सभेचा भत्ता असे ३ लाख रुपये अहिरे यांच्या कुटुंबियांना कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष व सरव्यवस्थापक दीपक पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केला.

कर्मचाऱ्‍यांवरील बँकेतील व अन्य गोष्टींचा कामाचा ताण लक्षात घेता व मृत्यूचे वाढते प्रमाण विचारात घेता बँकेने सर्व कर्मचाऱ्‍यांच्या नावे विमा कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकी १० लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स उतरलेला आहे. कोणत्याही सेवकाच्या अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यूनंतर त्या सेवकाच्या कुटुंबियांना १० लाख रुपये विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. विम्याची १० लाखाची रक्कमही अहिरे यांच्या कुटुंबियांना दिली.

भारत सरकारतर्फे सुरू केलेल्या प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत २ लाखांची आर्थिक मदतही अहिरे यांच्या कुटुंबियांना दिली. अहिरे यांनी त्यांच्या सेवा कालावधीत बँकेच्या सेवेत कार्यरत असताना बँकेकडून दिल्या जाणाऱ्‍या प्रॉव्‍हिडंड फंड, ग्रॅच्युईटी व रजा पगार यांसारख्या सुविधांचा आर्थिक लाभही बँकेकडून मृत सेवकाच्या कुटुंबियांना दिला जातो. त्याचाही लाभ अहिरे यांच्या कुटुंबियांना दिला.