‘पुष्पा 2’ची सध्या चाहत्यांना उत्सुकता आहे. अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा हा बहुचर्चित सिनेमा अवघ्या काही दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त ७ दिवस उरले आहेत.येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. तर चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग कधी सुरू होणार हे जाणून घेऊया. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘पुष्पा 2’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग हे 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाचं बजेट जवळपास 400 कोटी रुपये आहे. निर्मात्यांना आशा आहे की बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा पार करेल.
एवढंच काय तर अल्लू अर्जूनची क्रेझ पाहता चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवण्याची शक्यता आहे. आजवर प्रभासच्या ‘बाहुबली 2’साठी 100 कोटींचं रेकॉर्डब्रेक बुकिंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर यशच्या ‘केजीएफ 2’चा नंबर लागतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा ‘RRR’ सिनेमा आहे.
आता ‘पुष्पा 2’ हा रेकॉर्ड मोडतो का, हे पाहावे लागेल.दरम्यान, ‘पुष्पा 2’ हा देशातील सर्वाधिक लांबीचा चित्रपट असण्याची शक्यता आहे. सिनेमाचा रनटाइम रणबीर कपूरच्या ॲनिमलपेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे सुमारे साडेतीन तास प्रेक्षकांना थिएटरमध्ये बसावे लागणार आहे. ‘ॲनिमल’ ची लांबी 3 तास 21 मिनिटे होती. तर रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ देखील 3 तास 21 मिनिटे किंवा त्याहून अधिक लांब असू शकतो.