सांगोला विधानसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. ‘काय झाडी, काय डोंगर’, या डायलॉगमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. निवडणुका जिंकल्या की गुलाल, फटाके फोडून आनंद साजरा करणारे कमी नाहीत. पण, आपला विजय जनतेच्या हितासाठी सार्थकी लागावा यासाठी सांगोला (जि. सोलापूर) येथील शेतकरी कामगार पक्षाचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ज्या गावांमध्ये जितके मताधिक्य आहे, त्या गावात तितकी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
निवडणुकीत अंगाला गुलाल लागला की, लोकप्रतिनिधी जमिनीवर येतच नाहीत. जंगी मिरवणुका, सत्कार सोहळे यातच जे जास्त रममान होतात. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मात्र या सगळ्यांना फाटा देत वृक्षलागवडीचा केलेला संकल्प राज्यभर चर्चेत आहे. सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर डॉ. देशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुवाहटीच्या डोंगर, झाडांची भुरळ पडलेल्या शहाजीबापूंनी आता डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात तयार होणारी झाडी बघावी, अशाही मिश्कील प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत.