निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल, मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र, कारण…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8 दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र अनेकांनी या निकालानंतर ईव्हीएमववर आक्षेप घेतला. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदान क्षेत्रात दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच मनसेचे राजू पाटील यांनीही पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार का, अशी चर्चा रंगली आहे.

कल्याण ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या या निकालाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. दोन माजी आमदार, मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाचे राजेश मोरे यांचा या निवडणुकीत विजय झाला. या धक्कादायक विजयामुळे मतदारसंघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.